छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात भाजपा नेत्यासह तिघांना जिवंत जाळले; ट्रकांमध्ये फॉर्च्युनर अडकवून लावली आग

Foto
रायपूर - छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी नौगई गाव परिसरात मंगळवारी रात्री उत्खनन आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाच्या वर्चस्वावरून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर एका रक्तरंजित संघर्षात झाले आहे. हल्लेखोरांनी भाजपा नेते भरत सिंह उर्फ ​​लाला यांची फॉर्च्युनर कार ट्रकच्या मध्ये अडकवली आणि नंतर त्यावर पेट्रोल ओतून आग लावली. या भीषण अपघातात लाला सिंह यांच्यासह तिघांचा मृत्यू झाला आहे.

सुरुवातीच्या तपासानुसार, वाळू उत्खननाचे कंत्राट ठाकूर भरत सिंह उर्फ लाला यांच्या कुटुंबाकडे होते, तर वाळूची वाहतूक करण्यासाठी वापरले जाणारे टिपर ट्रक त्रिपाठी कुटुंबाच्या मालकीचे होते. आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वावरून गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही कुटुंबामध्ये तणाव वाढत होता. मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता जेव्हा भरत सिंह आपल्या सहकाऱ्यांसोबतच्या चर्चेसाठी निघाले, तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी फॉर्च्युनर कारला बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तिच्या पुढे आणि मागे ट्रक उभे केले. त्यानंतर कारवर पेट्रोल ओतून तिला आग लावण्यात आली.

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

या भीषण घटनेत भरत सिंह यांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर त्यांचे चुलत भाऊ नागेंद्र सिंह आणि वीरेंद्र सिंह यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी एक जखमी मयंक सिंह यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर संपूर्ण कोरिया जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अक्षत आणि विशाल यांच्यासह चार आरोपींना अटक केली आहे. या प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. 

दरम्यान, या घटनेत नऊ आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी अक्षत त्रिपाठी आणि विशाल त्रिपाठी यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरेश चौबे यांनी दिली. या घटनेवर मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी भाष्य केले. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही असं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं.